नितीन गडकरींना स्टेजवरच भोवळ, राज्यपालांनी बसवले खुर्चीत

Foto

राहुरी (अहमदनगर) – केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी विद्यापीठातील दीक्षांत समारंभात स्टेजवरच भोवळ आली. राष्ट्रगीत सुरु असताना गडकरी यांना भोवळ आली. शेजारी उभे असलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गडकरींना सांभाळत खुर्चीवर बसवले. प्राथमिक उपचारानंतर गडकरी विशेष विमानाने नागपूरला रवाना झाले. त्यांचे अहमदनगरमधील पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात नितीन गडकरी यांना भोवळ आली. येथे त्यांनी अर्धातास भाषण केले होते. शेवटी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली. त्यांच्या शेजरी उभे असलेले राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी गडकरींना सांभळले आणि खुर्चीत बसवले. विद्यापीठातच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर ते स्वतः चालत कारपर्यंत गेले. मात्र त्यांचे शुक्रवारचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करुन विशेष विमानाने ते नागपूरला रवाना झाले. दीक्षांत समारंभानंतर ते शिर्डी येथे साई दर्शनासाठी जाणार होते.

गडकरींना शुगर?

केंद्र सरकारमधील सर्वात व्यस्त मंत्री म्हणून गडकरींना ओळखले जाते. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याची माहिती समोर येत आहे. वेळेवर औषधी आणि पुरेशे जेवण न घेतल्यामुळे त्यांना भोवळ आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.